नाशिक – राज्यभर नव्या कांद्याचे आगमन लांबणीवर असल्याने चाळीतल्या कांद्याची तेजी कायम राहिली आहे.
निर्यातीच्या प्रक्रियेत अद्याप तरी कोणतेही अडथळे आलेले नाहीत, त्यामुळे सव्वा सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलने नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला.
३५ ते ४० टक्के उन्हाळ कांदा अद्याप चाळींमध्ये आहे. या कांद्याचा दर्जा अजून चांगला आहे, मात्र चाळींना वरचे वर चाळणी न मारल्याने व जुन्या पद्धतीच्या चाळी असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात कांदा फेकावा लागतो आहे. अर्थात, हे प्रमाण अत्यल्प आहे. पिंपळगावला गेल्या आठवड्यात सरासरी १८० ते २०० ट्रक कांद्याची आवक झाली.
लासलगावला १५० ते १८० ट्रक आवक होत होती, तर “कसमादे’ पट्ट्यातील कांदा उ त्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका म्हणजे १५० ट्रकच्या वर कांदा आवक होती. बैलगाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीतून बाजार समित्यांमध्ये कांदा आणला जातो. व्यापाऱ्यांकडून ट्रक व रेल्वे वॅगनच्या माध्यमातून विविध ठिकाणी सदर माल पाठविला जातो.